Kalpataru Ayurved Chikitsalaya™

पराकोटीचा उपभोगवाद, तथाकथित फास्ट लाईफस्टाईल, स्वकेंद्रित विचारसरणी, जीवघेणी स्पर्धा, इंटरनेट – सोशल मीडियाचा अत्यधिक वापर यामुळे सध्या मानसिक ताणतणाव, नैराश्य, चिंता,, निद्रानाश हे विकार मोठ्या प्रमाणावर बोकाळले आहेत. आजकाल दवाखान्यातही सकृतदर्शनी शारीरिक दिसणाऱ्या अनेक विकारांचे मूळ हे अस्वस्थ मनःस्थिती, ताणतणाव यातच दिसून येते. वैद्यकशास्त्रात अशा मनोकायिक आजारांची( Psycosomatic disorders) मोठी यादी आहे. उदा. निद्रानाश, डोकेदुखी, अपचन, रक्तदाब , मधुमेह, थायरॉईड, स्थौल्य, कँसर, पाठ कंबर दुखी, अंग दुखी, सोरायसिस, इसब इ. अनेक अनेक त्वचा विकार इ. म्हणूनच मनस्वास्थ्य हे उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे असे म्हंटले तर अतिशयोक्ती ठरू नये.

आयुर्वेदामध्ये मनो रोगाची चिकित्सा सांगताना अनेक प्रभावी उपचार सांगितले आहेत.

1. आयुर्वेदामध्ये मनो रोगाची चिकित्सा सांगताना अनेक प्रभावी उपचार सांगितले आहेत.

2. शिरोधारा :- कोमट औषधी तेलाची कपाल परदेशी धार सोडणे. या प्रक्रियेमुळे मेंदूतून उपयुक्त अशा संप्रेरकांची उत्पत्ती जास्त होते व नकारात्मक संप्रेरकांची पातळी कमी होते

3. तक्रधारा :- शिरोधारा प्रमाणेच असणाऱ्या या प्रक्रियेत तेलाऐवजी औषधी ताकाचा वापर केला जातो. शिरोधारा उपक्रमामुळे रुग्ण हा थेरेपी टेबल वरच झोपतो हा नेहमीचा अनुभव आहे. मानसिक ताण तणाव जन्य अनेक विकारांमध्ये ही हुकमी चिकित्सा आहे.

4. नस्य :- नासा हि शिरसो द्वारम् । अशी आयुर्वेदात उक्ती आहे. नासिकेवाटे दिलेली अनेक द्रव्ये, सिद्ध तेले अथवा घृत या माध्यमातून दिल्यास चिंता, नैराश्य, इंद्रिय ग्रहणशक्ती कमी होणे , विस्मरण, चंचलता इ. विकारात उपयुक्त ठरतात. याला नस्य असे म्हणतात.

5. बस्ति :- पचनातील बिघाडामुळे झालेली अपान वायूची विकृती ही प्राणवायूलाही पुढे जाऊन बिघडवते व त्यामुळे अनेक शिरोविकार, मानसविकार होतात. अशा वेळी गुद मार्गाद्वारे काढा, तेल स्वरूपात द्रव्य आत सोडणे या प्रक्रियेद्वारे मनोरोगांवर नियंत्रण मिळवता येते.याला बस्ती चिकित्सा म्हटले जाते.यावरही खूप मोठ्या प्रमाणावर संशोधन होत आहे.

6. मन या इंद्रियांमध्ये व्याधी उत्पत्ती होत असली तरी वात-पित्त-कफ या त्रिदोषातील असंतुलन हेच त्याला कारणीभूत असते. त्यामुळे त्यांच्यातील साम्यावस्था प्रस्थापित केल्यास मनोविकार शमतात.

7. रक्तात संचित झालेली अनेक विषारी द्रव्ये (toxins) ही सुद्धा मेंदू व मन यांच्या कार्यप्रणालीत बिघाड निर्माण करतात. त्यामुळे रक्त शुद्धी चे उपाय महत्त्वाचे ठरतात.

8. आश्वासन आणि समुपदेशन:- मनोविकार ग्रस्त रुग्णाला विश्वासात घेऊन कधी रागावून तर कधी गोंजारून, विविध क्लृप्त्या-तंत्रे वापरून त्या आजारातून बाहेर येण्याबाबत आश्वासन आणि समुपदेशन औषधोपचाराइतकेच महत्त्वाचे असतात.

मन स्वास्थ्यासाठी काही महत्त्वाच्या उपयुक्त टिप्स :-

स्वीकार- सर्वप्रथम आपण जसे आहोत त्याचा स्वीकार करावा,आदर करावा. निसर्गाने प्रत्येकाला काही खूबी,वैशिष्ट्ये, वेगळेपणा देऊन पाठवलेले असते. आपल्यातील चांगल्या गुणांवर लक्ष केंद्रित करून त्यांचा विकास करावा. मग इतर काही त्रुटी, दुर्गुण (जे सर्वांमध्येच काही प्रमाणात असतातच) हळूहळू फिके पडू लागतात.

कृतज्ञता – जे काहीसे अपयश, अपमान, कमतरता असतील त्यापेक्षा पूर्वी मिळालेले यश, मान, कौतुक यांचे स्मरण ठेवावे. ज्यांना अतिगंभीर आजार, वैगुण्य आहेत तसेच ज्यांच्यावर संकटांचे पहाड कोसळून ते उध्वस्त झाले आहेत त्यांच्यापेक्षा आपण कितीतरी बऱ्या अवस्थेत आहोत याचे स्मरण ठेवावे. म्हणजे मग आपल्या बाबतीतील कमालीची नकारात्मकता कमी होते.

अवास्तव खर्च, उधळपट्टी, स्पर्धा- असूयेतून होणाऱ्या गोष्टी टाळाव्यात. त्यातून क्षणिक आनंद वाटला , अहंकार सुखावला तरी पुढे अनेक अवघड परिस्थिती निर्माण होऊन विविध मनोरोगांचा प्रवेश होतो.

काहीतरी छंद कला जोपासावी – प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी तरी कठीण प्रसंग येतात. तसेच रोजच्या रहाटगाडग्याच्या आयुष्यामुळेही कंटाळा, उबग, त्रागा होतो. त्यावर छंद हे उत्तम टॉनिक आहे. इंडॉर्फिन, सिरोटोनिन अशी अनेक चांगली संप्रेरके यातून मेंदूत स्त्रवतात. त्याने जीवनाला उभारी येते. आशादायक वातावरण निर्माण होते.

निखळ मैत्री – विशेषतः कोरोना काळात मैत्रीची महती सर्वांनाच लक्षात आली असेल. केवळ आजारपणात एकमेकाला मदत करण्यापुरते मर्यादित नाहीतर मानसिक आधार देणे, मन मोकळे करायला हक्काची जागा असणे, एकत्र येऊन काही कार्यक्रम – करमणूक – हास्यविनोद करणे या सर्वांसाठी मित्र हे अत्यंत महत्त्वाचे ठरतात. आपल्या मनातील शल्य कोणापाशी बोलताच न येणे व त्यात कुढून कुढून विविध मनोविकारांची मालिका सुरू होणे हे दुर्दैव अनेकांच्या नशिबी येते.

हास्य – वेदनेवरची फुंकर म्हणजे हास्य! हसण्याच्या प्रक्रियेमध्येही मेंदूत अनेक चांगले बदल होतात. सकारात्मक, उत्साहवर्धक, वेदनानिवारक गुणधर्माचे संप्रेरक( endorphins) तयार होतात. Norman Cousins या लेखकाने अत्यंत गंभीर अशा संधीवातावर फक्त उत्तम विनोदाने कशी मात केली याविषयीचे पुस्तक खूपच रंजक आहे. ही विनोदाची ताकद आहे. जीवनातील संकटांकडे खुल्या दिलाने पाहण्याची मानसिकता विनोदाने तयार होते.

निसर्गाशी जवळीक – यामुळे तथाकथित भौतिक गोष्टींवरील अतिव प्रेम, आसक्ती कमी होते. निसर्गाची भव्यता – दिव्यता माणसाला नम्र, कृतज्ञ बनवते. सहली, picnics, पर्वतारोहण याने शारीरिक क्षमता वाढते, उत्साह दुणावतो. आपलाच आपल्याप्रतीचा आदर वाढतो. मोकळी हवा, प्रकाश, पाऊस, पाणी, वारा यामुळे मेंदूलाही तरतरी येते.

उपकरणांवरील अवलंबित्व कमी करणे – वारंवार उत्तेजना देणारे व्हिडिओ पहाणे, सतत समाज माध्यमांवर सक्रिय राहणे, त्यातून होणारे हेवेदावे गैरसमज याला अंत नाही. यामुळे मेंदूला व्यसन निर्माण करणाऱ्या डोपामाइन या संप्रेरकाचा मेंदूत जणू पूरच येतो. वास्तविक हे विधायक कामांसाठी उपयुक्त असणारे हार्मोन , पण जास्त मात्रेत खूप त्रासदायक ठरते. त्यामुळे मेंदूला – मनाला छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळणे बंद होते. त्यामुळे त्याला दैनंदिन जीवन रटाळ, कंटाळवाणे वाटते. मग प्रत्येक वेळी आनंदी, उत्साही राहण्यासाठी मोबाईल पाहणे, तोच तोच कन्टेन्ट पाहणे जणू सक्तीचे होते. अनेक मनोविकारांना यातून सुरुवात होते. म्हणून गरजेपुरताच इंटरनेटचा वापर करणे हे फार महत्त्वाचे आहे. वाचनासाठी प्रत्यक्ष पुस्तक वाचणे हे कधीही श्रेयस्कर!

परोपकार,निरपेक्ष मदत – खरे पाहता परोपकार हा वेगळ्या पद्धतीने पाहिल्यास आपल्यावरच उपकार असतो. एखाद्याला निरपेक्ष मदत करताना मेंदूमध्ये खूप चांगले बदल घडतात. वृत्ती उत्साही, आनंदी राहील अशी संप्रेरके तयार होतात. आपलीच प्रतिमा आपल्या मनात उजळून निघते. त्यातून व्यक्तिमत्व विकास होतो.आपण कोणाच्या भल्यासाठी उपयोगी पडतो ही भावना स्वप्रतीमा सुधारण्यासाठी खूप उपयोगी असते.

व्यायाम – प्राणायाम – दीर्घश्वसन – ध्यान – व्यायामाने हृदय – फुफ्फुसाचे आरोग्य सुधारते. मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या खुल्या राहतात. मेंदूला भरपूर पोषक तत्वे, प्राणवायूचा पुरवठा होतो. योग – प्राणायामाने एकाग्रता सुधारते. मेंदूतील parasympathetic nervous system (शांतता, सृजनशीलता,समाधान, आनंद, इ. संबंधित) सक्रिय होते. भावना विषयक गोष्टींचे नियंत्रण करणारी लिंबिक सिस्टीम चांगली कार्य करते. नैराश्य, चिंता यांचे परिणाम कमीत कमी होतात. कोणत्याही बाह्य वस्तू – परिस्थितीवर अवलंबून नसलेला असा आनंद निर्माण होतो.

दीर्घश्वसन – ध्यान याने भय, नकारात्मकता, चिंता, धास्ती( phobia) कमी होते. विशेष म्हणजे रोगप्रतिकारशक्तीमध्ये चांगलीच सुधारणा होते. मन – मेंदू – संप्रेरके – व्याधिक्षमत्व (psyco- neuro- endocrino- immunological axis)असा एकमेकांशी संबंध असतो.

पोषण – संतुलित आहार,सात्विक आहार, आहारात पालेभाज्या, फळे, कच्चा आहार , सुका मेवा, शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेले गाईचे साजूक तूप यांचा समावेश खूप उपयुक्त ठरतो. फास्ट फूड, जंक फूड, साखरेचा – तेलाचा अती वापर याने मेंदू व पर्यायाने मनाचीही हानी होते. आहार हा ताजा पुरेशा प्रमाणात (जास्त तर अजिबात नको), चौरस, षड्रस युक्त (गोड, आंबट, खारट, तिखट, कडू, तुरट यांचे योग्य संतुलन) असणे हे फार महत्त्वाचे आहे, फायद्याचे आहे. एवढे सांभाळूनही काही अपरिहार्य कारणाने मानसिक विकार झाले तरी त्यात काहीही न्यूनगंड न बाळगता मोकळेपणाने बोलणे, औषधोपचार करून घेणे हे महत्त्वाचे असते. वेळेत केलेले उपाय पुढील अनेक गंभीर आजारांना नियंत्रित करू शकतात. तर एवढे महत्त्व आहे मनाच्या आरोग्याचे! म्हणूनच समर्थांनी प्रत्यक्ष मनासाठी मनाचे श्लोक’रचले.
मन एव मनुष्याणाम् कारणं बंधमोक्षयो: ।
असे हे आपले परम सखा – मित्र मन जणू विद्युत उर्जेप्रमाने आहे. विजेचा विधायक नियंत्रित सुरक्षित पद्धतीने वापर केला तर ती घरातील अंधकार दूर करून घर प्रकाशमान करेल पण जर निष्काळजीने वापरली तर घर भस्मसात करेल. सुनियंत्रित , सुचलित मनाने मोक्षासारखे भव्य – दिव्य फळ मिळेल आणि बेताल – सैराट वृत्तीने अनेक बंधनांमध्ये संकटांमध्ये अडकेल.

Choice Is Your’s!!!
डॉ मनोज म देशपांडे
कल्पतरू आयुर्वेदीय चिकित्सालय,
545, नारायण पेठ, पुणे.

Stay Connected with Kalpataru Ayurvediya Chikitsalaya™

Join the Kalpataru Ayurvediya Chikitsalaya™ community today and let Ayurveda guide you toward a healthier, more balanced life.

This field is required.
Related Tags:
Social Share: